“जखमी वाघाच्या जबड्यात हात घालू नका”; बजरंग सोनवणेंचा धनंजय मुंडेंवर थेट प्रहार

बीड हत्याकांड: “जखमी वाघाच्या जबड्यात हात घालू नका”; बजरंग सोनवणेंचा धनंजय मुंडेंवर थेट प्रहार!

बीड: सध्या संपूर्ण राज्यात बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणामुळे खळबळ माजली आहे. या प्रकरणाचे पडसाद आता थेट मुंबईतील पावसाळी अधिवेशनातही उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या मुलाचे नाव या प्रकरणात गोवण्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर सोनवणे यांनी आक्रमक पवित्रा घेत विरोधकांवर, विशेषतः नाव न घेता धनंजय मुंडेंवर जोरदार हल्ला चढवला आहे.

“मुलाचे नाव येणे दुर्दैवी, पण मी डगमगणार नाही” विलास घुले यांच्या हत्येचा संदर्भ देत बजरंग सोनवणे म्हणाले की, या प्रकरणात त्यांच्या मुलाचे नाव येणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. “ज्यांना राजकारण करायचे आहे ते करू देत. जे राजकारणात निकामी झाले आहेत, तेच अशा प्रकारे कोणाच्यातरी आडून वार करण्याचे काम करत आहेत,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. ही हत्या वैयक्तिक वादातून झाली असल्याचे सांगत त्यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळायला हवा, अशी भूमिकाही मांडली.

संजय दिना पाटील: वादांचा ‘धडाका’ आणि राड्यांचा इतिहास

“सगळे काळे धंदे बाहेर काढणार!” मुंबईत सुरू असलेल्या अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यावर सोनवणे अधिकच आक्रमक झाले. त्यांनी मुंडेंना थेट आव्हान दिले की, “२९ तारखेच्या नंतर ते सदस्य राहतील का ते बघू; त्यानंतर त्यांना आमदार होऊ देणार नाही हे लिहून ठेवा”. इतकेच नाही तर, “माझ्याकडे त्यांच्यासारखा ब्लॅक मनी नाही, पण तुझे सगळे धंदे मी बाहेर काढणार; तू कुठे जातो, कोणाकडे असतो आणि किती वाजता असतो, हे सगळं मला माहित आहे,” असा थेट इशारा त्यांनी दिला.

“मी जखमी वाघ आहे…” आपल्या फॅमिलीला विनाकारण राजकारणात ओढणाऱ्यांना इशारा देताना सोनवणे म्हणाले, “त्यांनी एका दुखावलेल्या बापाच्या आणि जखमी वाघाच्या जबड्यात हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. मी जखमी आहे असे त्यांना वाटत असेल, पण मी वाघ आहे आणि वाघच राहणार”. पोलिसांवर आपला पूर्ण विश्वास असून दोषी असल्यास कारवाई करा, मात्र राजकीय द्वेषापोटी अडकवू नका, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे.

बीडमध्ये विलास घुले हत्या प्रकरणावरून राजकीय रणकंदन

बीडमधील या हत्याकांडाने आता वैयक्तिक आणि राजकीय वळण घेतल्याने आगामी काळात जिल्ह्याचे राजकारण कोणत्या दिशेला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोनवणे यांनी दिलेले हे खुले आव्हान मुंडे गट कसे स्वीकारतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top