
न्यायासाठी २० वर्षांची प्रतीक्षा; ओमराजे निंबाळकरांचा भावनिक लढा आणि राजकीय भविष्याची चाहूल
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर सध्या एका मोठ्या भावनिक आणि राजकीय वळणावर उभे आहेत. ३ जून २००६ रोजी त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. योगायोगाने, तब्बल २० वर्षांनंतर या प्रकरणाचा निकालही शनिवारीच लागला, ज्या दिवशी वडिलांची हत्या झाली होती तो ही शनिवारच होता. कोर्टाने हत्येचा राजकीय उद्देश (Motive) आणि राजकीय वैमनस्य मान्य केले असले तरी, प्रत्यक्ष आरोपींच्या बाबतीत मिळालेल्या निकालावर ओमराजे समाधानी नाहीत. “न्यायालय म्हणतंय हत्या करण्याचा उद्देश होता, पण मग मारलं कोणी?” असा सवाल करत त्यांनी आता या निर्णयाविरोधात सीबीआयसोबत हायकोर्टात दाद मागण्याचे स्पष्ट केले आहे.
ओमराजे यांच्या राजकारणाची सुरुवातच एका धगधगत्या संघर्षातून झाली. वडिलांच्या हत्येनंतर, केवळ एका माणसाला मारल्याने राजकीय विरोधक संपत नाही, हे दाखवण्यासाठी त्यांनी सार्वजनिक जीवनात पाऊल ठेवले. ते म्हणतात, “माझ्या राजकारणाचे मूळच वडिलांच्या हत्येच्या न्यायात आहे”. मात्र, इतके कष्ट करूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, याचे दुःख त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवते. ‘मशाल’ चिन्हावर लढणाऱ्या आणि २४ तास जनतेसाठी उपलब्ध असणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची हेटाळणी का झाली, हा प्रश्न त्यांना सतावत आहे.
पवनराजे निंबाळकर हत्या खटल्याचा २० वर्षांनंतर निकाल; पद्मसिंह पाटील यांच्यासह ९ जण निर्दोष! तपासावर कोर्टाचे ताशेरे
विशेष म्हणजे, ठाकरे कुटुंबाबद्दल त्यांच्या मनात आजही प्रचंड आदर आहे. “उद्धवजी, आदित्यजी किंवा बाळासाहेबांच्या कुटुंबाबद्दल मी कधीही एकही चुकीचे अवाक्षर काढलेले नाही,” असे म्हणत त्यांनी आपल्या निष्ठेचा पुनरुच्चार केला आहे. काही ठिकाणी त्यांच्याबद्दल चुकीच्या मुलाखती छापल्या गेल्यामुळे त्यांनी तीव्र वेदना व्यक्त केल्या आहेत.
राजकीय निर्णयाबाबत बोलताना ओमराजे अत्यंत संयमी भूमिका घेत आहेत. ते म्हणाले की, माझा कोणताही निर्णय हा धाराशिवच्या जनतेशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याशिवाय होणार नाही. “ज्या सामान्य माणसाने मला इथपर्यंत पोहोचवले, त्यांचा पहिला अधिकार आहे,” असे सांगत त्यांनी आपल्या पुढच्या वाटचालीचे संकेत दिले आहेत. ओमराजे यांचा हा लढा केवळ सत्तेसाठी नसून, तो एका मुलाने आपल्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरू केलेला १८-२० वर्षांचा दीर्घ संघर्ष आहे
ओमराजे निंबाळकर: वडिलांच्या हत्येचा निकाल आणि राजकीय भवितव्य; ठाकरेंसोबत की शिंदेंकडे?

Mahesh Rathod is a News Writer at Maharashtra Trending with over five years of experience covering Maharashtra politics, breaking news, social issues, crime, and current affairs. He is committed to delivering accurate, timely, and reliable news that keeps readers informed about the latest developments across the state.








